नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेले अंदाजपत्रक हे आत्मनिर्भर भारताचं ऐतिहासिक अंदाजपत्रक आहे आणि या अंदाजपत्रकामुळे विविध क्षेत्रात मोठी प्रगती होणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. या अर्थसंकल्पामुळे लोकांच्या राहणीमानात सुलभता येईल; त्याच बरोबर सर्व सामान्य नागरिक, गुंतवणूकदार, उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी अनेक सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशातून व्यक्त केला आहे.

या अर्थसंकल्पात आरोग्यसेवेला अभूतपूर्व महत्व दिले असून संशोधन आणि नवोन्मेषावर भर दिल्याचा विशेष आनंद होत आहे  असे मोदी यांनी म्हटले आहे. यामुळे संपत्तीचे निर्माण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा होणार आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठीचा अर्थसंकल्प असून मेहनती अन्नदात्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास आणि भविष्यातील तंत्रज्ञानासह या क्षेत्राला चालना देण्यास पूरक ठरणारा असा आहे.

अर्थसंकल्पात दक्षिण राज्ये, ईशान्य, लडाखच्या आकांक्षांवर विशेष भर दिसून येत आहे. किनारपट्टी क्षेत्राच्या आणि मच्छीमार समुदायाच्या सक्षमीकरणासाठी चांगल्या किनारपट्टीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

आरोग्य सुविधांवर भर असलेल्या या अर्थसंकल्पात युवकांसाठी रोजगार, महिलांसाठी सुलभ जीवनमान यासाठी देखील भरीव तरतूद केली असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.