मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा असून, गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा तो सुमारे पावणे सतरा टक्क्यानी जास्त आहे. या अर्थसंकल्पात २७ हजार ८११ कोटी ५३ लाख रुपयांच्या महसुली उत्पन्नाचा अंदाज मांडला आहे.

गेल्यावर्षीच्या अंदाजापेक्षा तो ६३६ कोटी ७३ लाख रुपयांनी कमी आहे. कोरोना संकट काळात महापालिकेला मदत करणाऱ्या हॉटेलांना  मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे. कोविड काळात काम करताना निधन झालेल्या कोविड योद्ध्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत देण्याची तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.

त्याआधी, शिक्षण खात्याचा २ हजार ९४५ कोटी ७८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत अध्यक्ष संध्या दोशी यांना सादर केला. या अर्थसंकल्पात, पालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, विज्ञान कुतूहल भवनाची निर्मिती, विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ प्रकारच्या विविध शालेय उपयोगी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ७८ कोटी ८७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. सीबीएससी बोर्डाच्या दहा नवीन शाळांसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

धोकादायक शालेय इमारतींची दुरुस्ती, मुख्याध्यापक अधिकाराचं विकेंद्रीकरण, माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, आदी बाबींसाठी निधीची भरीव तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात नवीन बाबी अथवा योजनांचा विषेश उल्लेख नाही .

गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प २ हजार ९४४ कोटी ५९ लाख रुपयांचा आणि १०२ कोटी १३ लाख रुपये शिलकीचा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा हा अर्थसंकल्प १ कोटी १९ लाख रुपयांनी जास्त आहे.