नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड – 19 च्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनासंबंधी आवश्यक ते सर्व सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र आणि केरळमध्ये दोन स्वतंत्र उच्चस्तरीय पथकं पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

देशातील कोविड – 19 मुळे बाधित असलेल्या रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण सध्या या दोनच राज्यांमध्ये आहेत. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देशात 97  पूर्णांक 5 दशांश टक्क्यांवर पोचलं असताना महाराष्ट्रात ते अजून 95 पूर्णांक 37 शतांश टक्क्यांपर्यंतच आहे.

देशातली इतर राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्यानं घट होत असताना केरळसह महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण अद्याप फारसं कमी झालेलं नाही. त्यामुळे साह्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

महाराष्ट्रासाठी पाठविण्यात येणाऱ्या पथकामध्ये राष्ट्रीय रोगनियंत्रण संस्था आणि नवी दिल्ली इथल्या आर. एम. एल. रुग्णालयामधील तज्ज्ञांचा समावेश आहे. दोन्ही राज्यांमध्ये पाठविण्यात येणारी ही पथकं राज्यांच्या आरोग्य विभागांशी समन्वय साधून काम करतील आणि दररोजच्या स्थितीचा आढावा घेतील.

रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याच्या दृष्टीनं तातडीच्या उपाययोजना सुचविणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं ही कामं ही पथकं करणार असल्याचं केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, केंद्राच्या या निर्णयाचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं आहे. कोविड 19 च्या नियंत्रणासाठी केंद्राबरोबर समन्वयानं काम करण्याचं आणि या पथकाला आवश्यक ते सर्व सहाय्य पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे