पुणे स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत सीईओंचे दिल्लीत सादरीकरण

पुणे : पुणे स्मार्ट सिटीच्या सहा प्रकल्पांची केंद्र सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या (MoHUA) वतीने स्मार्ट विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स (ISAC) स्पर्धा २०१९ ही ३१ जानेवारी २०१९ रोजी घोषित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) एकूण नऊ प्रकल्पांसाठी नामांकन करण्यात आले होते. त्यापैकी सहा प्रकल्प अंतिम फेरीत पोचले असून, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी नुकतेच दिल्ली येथे त्याबाबतचे सादरीकरण केले.

यापूर्वी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आपण मागील वर्षी सन २०१८ मध्ये या स्पर्धेत त्यावेळी पूर्ण झालेल्या एकूण दहा प्रकल्पांचे नामांकन करण्यात आले होते. त्यापैकी चार म्हणजेच प्रकल्पांसाठी पुणे स्मार्ट सिटीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. स्मार्ट सिटी स्पर्धेत देशात सर्वाधिक पुरस्कार मिळविणारे शहर ठरले होते. पुरस्कारप्राप्त प्रकल्पांमध्ये मागील वर्षी स्मार्ट प्लेसमेकिंग, स्मार्ट पीएमसी केअर, स्मार्ट लाईटहाऊस, स्मार्ट पब्लिक बायसिकल शेअरिंग या प्रकल्पांना पुरस्कार प्राप्त झाले होते.

या वर्षीदेखील पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स (ISAC) स्पर्धा २०१९ मध्ये भाग घेतला आहे. या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या ३३ स्मार्ट सिटींमध्ये पुणे स्मार्ट सिटीचा समावेश झाला. त्यामध्ये आपण स्मार्ट स्कूल, स्मार्ट क्लिनिक, स्मार्ट आर्ट वीक, पिफ- हॅकेथॉन्स, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट प्लेसमेकिंग, स्मार्ट स्ट्रीट लाईटिंग, स्मार्ट पीएमसी केअर २.०, स्मार्ट ई-बस या नऊ प्रकल्पांचे नामांकन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील नामांकनांनंतर अंतिम फेरीसाठी स्मार्ट क्लिनिक, स्मार्ट आर्ट वीक, स्मार्ट प्लेसमेकिंग, स्मार्ट स्ट्रीट लाईटिंग, स्मार्ट पीएमसी केअर २.०, स्मार्ट ई-बस सहा प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे.