मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना mahadbtmahait.gov.in (महाडीबीटी) या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन मुंबई शहरचे समाजकल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता इ. योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता महाडिबीटी पोर्टल ३ डिसेंबर पासून सुरू झालेले आहे. त्या अनुषंगाने सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नविन प्रवेशित (Fresh) व नुतनीकरण (Renewal) महाडीबीटी प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याकरीता विद्यार्थ्यांना आपल्या स्तरावरुन सूचना द्याव्यात.

महाविद्यालयांनी त्यांचे स्तरावर प्राप्त अर्जाची पडताळणी करुन परिपूर्ण पात्र अर्ज जिल्हा समाज कल्याण लॉगीनला विहीत मुदतीत ऑनलाईन पद्धतीने पाठवावेत. सन २०११-१२ ते २०१७-१८ या कालावधीमधील अन्वेषण प्रस्तावामधील आवश्यक प्रपत्र ‘क’ महाविद्यालयांनी दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजीपर्यंत या कार्यालयास सादर करावेत व ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. सन २०१८-१९ व २०१९-२० या वर्षामधील महाडीबीटी पोर्टलवरील बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार नंबर बँकेमधील विद्यार्थ्यांच्या खात्याशी NPCI लिंक नसल्याने विद्यार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यांचा आधार नंबर त्यांचे बँक खात्यासोबत NPCI लिंक करून महाडीबीटी प्रणाली मधील त्यांचे खाते अपडेट करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर समाधान इंगळे यानी केले आहे.