पिंपरी : 8 मार्च जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला भगिनींना शुभेच्छा देण्या अगोदर महिलांना भेडसावणारे प्रश्न सोडवावेत. केंद्रसरकारने महागाई, सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण, रोजगार याबाबत सक्षम धोरण तयार करून त्याची कडक त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी पत्राव्दारे नायब तहसिलदार प्रविण ढमाले यांच्याकडे केली आहे.

सोमवारी (8 मार्च) गिरीजा कुदळे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामलाताई सोनवणे तसेच संगीता कळसकर, नूरबानू शेख, मीना गायकवाड, मीना वाघमारे आदी उपस्थित होते.

या पत्रामध्ये 2014 सालापासून वाढत्या महागाईमुळे महिलांना कुटुंबाचे चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे. पेट्रोल शंभरी पार झाले असून घरगुती गॅसची भाववाढ रोजचीच आहे. त्यामुळे महिला प्रचंड तणावाखाली आहेत, महिला भगिनींवरील अत्याचाराचा आलेख वाढताच आहे. अशा चिंताग्रस्त, आर्थिक विवंचनेत असणा-या महिलांना केंद्र सरकारने दिलासा देणे आवश्यक आहे. कोरोना या जागतिक महामारीमुळे लाखो कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे रोजगार बंद झाले आहेत. त्याचप्रमाणे हजारो महिलांचा देखील रोजगार बंद झाला आहे. यामध्ये घरकाम करणा-या महिला, मजूर, टपरी पथारी चालवून कुटुंब सांभाळणा-या महिलांची मोठी संख्या आहे. शेती, आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलिस प्रशासनात काम करणा-या महिला भगिनींनी कोरोना कोविड काळात अथक सेवा करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे. या वर्गातील महिलांसाठी विशेष धोरण राबविण्याची गरज आहे, अशीही मागणी गिरीजा कुदळे यांनी पत्राव्दारे केली आहे.