पुणे : ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने “सॅनिटरी कचऱ्याची पर्यावरण पूरक विल्हेवाट” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन इंटीग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर, सिंहगड रोड येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा उल्का कळसकर मुख्य लेखाधिकारी, पुणे मनपा, डॉ. संजय कोलते (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी तसेच स्वानंदी रथ, जागृती फाउंडेशनच्या संस्थापिका उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील मान्यवर अधिकारी व पुणे महापालिकेच्या विविध शाळेतील जवळपास २०० विद्यार्थीनी ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाल्या होत्या.
सॅनिटरी कचऱा हा महिलांच्या अतिशय जिव्हाळयाचा विषय आहे. त्यावर अधिक भाष्य करत नाहीत. त्याकरीता शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिका व अनेक समाजसेवी संस्था आपले योगदान देत आहेत. याकामी महिलांनी पुढे येऊन आपले योगदान देणे गरजेचे आहे. त्याकरीता प्रत्येकीनी आपल्या घरापासून सुरुवात करावी याचा फायदा सर्वांनाच होईल.
डॉ. संजय कोलते (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी म्हणाले जागतिक महिला दिनानिमित्ताने सॅनिटरी कचऱ्याचे विलगीकरण करण्याच्या जनजागृतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या स्थानिक क्षेत्र विकासाअंतर्गत औंध, बाणेर, बालेवाडी भागात शंभर टक्के सेंद्रिय कचरा प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने शुन्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्रोताच्या ठिकाणीच शंभर टक्के वर्गीकरण सुनिश्चित करणे व कचरा वाहतुकीवरील खर्च कमीत कमी करणे हे या प्रकल्पाचे उदिष्ट आहे. याकरिता ९७ हजार कुंटूंबाची माहिती संकलन व जीआयएस मॅपिंगची प्रक्रिया सुरु आहे.
वरील कचरा व्यवस्थापनाच्या मुलभूत सुविधा तयार केल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच मृदासंवर्धनास मदत होते. माहिती व दळणवळणाच्या उद्देशाने ३० स्वच्छता मित्रांची नेमणुक केली आहे. सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित करणे, संपूर्ण प्रकल्पाबाबत घरोघरी जागरुकता आणि उत्तेजन देण्याचे महत्वपूर्ण काम हे स्वच्छता मित्रांचे मुख्य उदिष्ट असेल.
जागृती फाउंडेशनच्या संस्थापिका स्वानंदी रथ म्हणाल्या, “सॅनिटरी वेस्ट” ही चळवळ म्हणून पुढे यायला हवी. तसेच सॅनिटरी कचरा ओला, सुका कचऱ्यात मोडत नाही. त्यानुसार लहान मुलांचे, वृध्दांचे डायपर, मासिकपाळी दरम्यान वापरात येणारे पॅड, बॅन्डेज, औषधी कापूस, मास्क इत्यादी कचऱ्याचे वर्गीकरण व्यवस्थितरीत्या करण्यात आले पाहीजे. त्याकरीता प्रत्येक महिलेने स्वत: पुढे येउन यात सहभागी होण्याची गरज असून आपल्या परिसरातील किमान तीन ते चार महिलांना जनजागृती करत कृतीशील सहभागी करुन घेतले पाहीजे. “हेल्थ सोल्जर म्हणून स्वच्छता कर्मचाऱ्याकडे पहावे”. सॅनिटरी वेस्ट हा विषय संकुचित होउन न हाताळता अभिमानाने याकडे पहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी चर्चासत्राचे अयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये अनिरुध्द शहापुरे मुख्य ज्ञान आधिकारी, पुणे स्मार्ट सिटी, डॉ.विजय पगारे, अश्विनी बोरकर यार्डी समाजसेवी संस्था प्रतिनिधी, रुपाली जगताप, ग्राफीक्स डिझायनर, वैशाली कासट फार्मासिस्ट व नेहा सराफ लोकमत प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाग्यश्री राऊत व राजनंदिनी देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वानंद शेडे कंपनी सचिव, पुणे स्मार्ट सिटी यांनी केले.