नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची आंतरराष्ट्रीय क्षयरोग प्रतिबंधक सहकार्य मंचाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. २०२५ पर्यंत भारतातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याच्या मोहिमेतील त्यांच्या भरीव योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून, येत्या जुलै पासून पुढील तीन वर्षांसाठी ते या अध्यक्षपदावर राहतील.

‘क्षयरोगमुक्त जग’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जगभरातील वैद्यकीय,सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ञ या सहकार्य मंचाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होतील आणि क्षयरोगाशी लढताना या अभिनव मंचाचे बळ वाढवणारे ठरतील.

डॉक्टर हर्षवर्धन यांची या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्षयरोग प्रतिबंधक सहकार्य मंचाच्या अध्यक्षपदी झालेली निवड हे भारताच्या क्षयरोग उच्चाटनाच्या मोहिमेतील राजकीय प्रतिबद्धतेचे द्योतक आहे. ही भारतासाठी अत्यंत गौरवास्पद घटना आहे.

आंतरराष्ट्रीय क्षयरोग प्रतिबंधक सहकार्य मंचाची स्थापना २००० साली करण्यात आली असून, जगभर सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान म्हणून उभ्या ठाकलेल्या क्षयाला हद्दपार करण्याचं उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले आहे.