पिंपरी: चिखली येथील रिव्हर रेसिडेन्सीच्या मागे असलेल्या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झालेली आहे. परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे खाणीमध्ये साचलेले जलपर्णी तात्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी रिव्हर रेसिडेन्सीचे चेअरमन जितेंद्र कदम यांनी केली आहे.

याबाबत कदम यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रिव्हर रेसिडेन्सी बिल्डिंग्सच्या मागे एक मोठी खाण असून, या खाणीमध्ये साचलेल्या दूषित पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झालेली आहे. या जलपर्णीमुळे व त्या ठिकाणी साचलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच जलपर्णीमुळे डास-किटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले असून, दुर्गंधीसह डासांच्या उपद्रवामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे तेथे राहणाऱ्या अडीच ते तीन हजार नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या अनुषंगाने सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन, खाणीत साचलेली जलपर्णी तात्काळ काढण्यात यावी, व परिसरात धुराची फवारणी करण्यात यावी, अशी मागणी जितेंद्र कदम यांनी केली आहे.