नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी तीन वर्षांमध्ये आरंभी सुमारे ३ बिलियन डॉलर्सचं पेडअप भांडवल आणि ६९ बिलियन डॉलर्स ऋण पुरवठ्याचं उद्दिष्ट यांच्या बळावर भारत एक नवी विकास वित्तीय संस्था बनण्यासाठी सज्ज आहे असं वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय विकास बँकेच्या संचालक मंडळाच्या सहाव्या वार्षिक बैठकीत त्या काल दूरदृष्य पद्धतीने सहभागी होताना बोलत होत्या.
कोरोनाच्या साथीचा परिणाम मर्यादित ठेवण्यासाठी भारतानं दिलेला त्वरित प्रतिसाद आणि हाती घेतलेली प्रचंड लसीकरण मोहिम सितारामन यांनी अधोरेखित केली.
भारतानं आजवर देशी लसीच्या सुमारे ६४ दशलक्ष मात्रा ८० देशांना पुरवल्या आहेत. यामध्ये दहा दशलक्षहून अधिक मात्रा अनुदान स्वरुपात दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.
राष्ट्रीय विकास बँकेनं गेल्या सहा वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीची नोंद घेताना त्यांनी कोविड साथीचा सामना करण्यात सदस्य देशांना पाठिंबा देण्याकरिता बँकेची भूमिका महत्वाची असल्याचं सांगितलं.
राष्ट्रीय विकास बँक ही ब्रिक्स देशांनी २०१४ मध्ये स्थापन केलली बहुउद्देशी विकास बँक असून चीनमध्ये शांघाय इथं तिचं मुख्यालय आहे. या बँकेनं भारतासाठी सुमारे ७ हजार दशलक्ष डॉलर्सचे १८ प्रकल्प आजवर मंजूर केले आहेत.