नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्च महिन्यातील वस्तू आणि सेवाकराची विक्रमी वसुली हे अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सकारात्मक बदलांचं प्रतिक असल्याचं मत केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव तरुण बजाज यांनी व्यक्त केलं आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि वित्तिय सुधारणांच्यामुळेच हे शक्य झाल्याचं बजाज यांनी आज ए एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. अर्थव्यवस्थेतले सकारात्मक बदल यापुढेही सुरू राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अर्थव्यवस्थेतली सुधारणा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे असं ते म्हणाले. कोविड १९ च्या वाढत्या प्रसाराबद्दल विचारलं असता, गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना संक्रमण सुरू झालं तेव्हा टाळेबंदीच्या माध्यमातून आपल्याला ते रोखण्याचा प्रयत्न करावा लागला आता मात्र कोरोनाशी दोन हात करायला सुसज्ज आहोत. पुरेशा वैद्यकीय सुविधा आपण निर्माण केल्या आहेत आणि आता लसही उपलब्ध आहे असं ते म्हणाले.