मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात काही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय मंत्रीमंडळानं घेतला आहे. आज रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना राज्याच्या अर्थचक्राला धक्का लागणार नाही, तसंच कामगारांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली असून, लोकांची गर्दी होणारी ठिकाणं बंद करण्यावर भर दिला आहे. मात्र शेतीविषयक कामं, सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील.
राज्यात १४४ कलम लागू केलं जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र यायला मनाई राहील. तर, रात्री ८ ते सकाळी ७वाजेपर्यंत संचारबंदी म्हणजे कोणत्याही व्यक्तीला योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवांना वगळलं आहे. याबाबत शासनानं नियमावली जारी केली आहे. त्यानुसार किराणा, भाजीपाला, औषधं इत्यादी आवश्यक आणि जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकानं, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांच्या दुकानांचे मालक तसंच कर्मचाऱ्यांना येत्या १० तारखेपर्यंत लसीकरण करावं लागेल.
चित्रपटगृहं, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुलं, सभागृहं, वॉटर पार्क्स, उपाहारगृहं, बार, कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील.
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणं बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालयं मात्र सुरू राहतील.
जी शासकीय कार्यालयं थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तिथं कर्मचारी उपस्थिती ५० टक्के मर्यादेपर्यंत राहील. अभ्यागतांना प्रवेश नसेल. सर्वधर्मीयांची स्थळं, प्रार्थना स्थळं भाविकांसाठी बंद राहतील. तिथले कर्मचारी, पुजारी यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. त्यांनाही लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावं लागेल. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल.
सार्वजनिक आणि खासगी बसेसमध्ये उभं राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. रिक्षा-टॅक्सीमध्ये चालक आणि दोन प्रवासी प्रवास करू शकतील. ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. शाळा- महाविद्यालयं बंद राहतील. मात्र १० वी आणि १२ परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.
आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला. उद्योग आणि उत्पादन क्षेत्र आरोग्याचे नियम पाळून सुरू राहील. वृत्तपत्र छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू राहील. मात्र विक्रेत्यांना लसीकरण करून घ्यावं लागेल. चित्रीकरण सुरु ठेवता येईल. मात्र चित्रीकरण स्थळी असलेल्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी झाल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक आहे. १० एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणं गरजेचं आहे. कोणत्याही कामगाराला कोविड झाला म्हणून काढून टाकता येणार नाही. त्याला आजारपणात पगारी रजा द्यायची आहे. कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदारानं करायची आहे. एखाद्या गृहनिर्माण संस्थेत ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित केली जाईल.