नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची जयंती आज जगभर साजरी होत आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र अत्यंत साधेपणानं आणि गर्दी न करता जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त गावोगावची मंडळ, विविध संस्था, संघटनानी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विविध विषयांवरची व्याख्यानं अशा कार्यक्रमाचं ऑनलाईन आयोजन केलं आहे. अशा विविध मार्गानी संपूर्ण देश बाबासाहेबांना अभिवादन करत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. समतेचा न्यायपूर्ण समाज तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी आजीवन संघर्ष केला, त्यांचं जीवन आणि त्यांच्या विचारातून शिकवण घेऊन त्यांचे आदर्श आचरणात आणण्याचा संकल्प आपण करूया, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे .

एक महान समाज सुधारक, विद्वान आणि भारतीय घटनेचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे मानवतावादी होते, त्यांनी आयुष्यभर जातीभेद आणि सामाजिक असमानता दूर करण्याचा प्रयत्न केला असं सांगत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबसाहेबांना आदरांजली वाहिली आहे. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबाबासाहेबांनी केलेला संघर्ष पुढच्या पिढ्यांसाठी कायम एक उदाहरण राहील, असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.