मुंबई (वृत्तसंस्था) :संचारबंदीची सांगली जिल्ह्यात कडक अंमलबजावणी सुरु झाली असून सांगली, मिरज शहरातील प्रमुख रस्ते सील करण्यात आले आहेत. विनाकारण बाहेर येणाऱ्यावर आळा घातला जात आहे.

मिरजेतील संपूर्ण बाजारपेठा बंद आहे, अत्यावश्यक सेवा तेवढ्या सुरू आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची एंटीजेन टेस्ट करून त्यांना कोरोना सेंटरमध्ये पाठवले जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावर बॅरिकेट लावून वाहतुकीला आणि लोकांना अटकाव केला आहे.

धुळे जिल्ह्यात बंदी असतांना सुद्धा वाईन शॉपवर मदय विक्री सुरू असताना पोलिसांनी आज कारवाई केली. वाईन शॉपचे मालक आणि अन्य तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात खासगी आणि एसटी बसची वाहतूकीच्या नियमात बदल करण्यात आले असून ही सेवा क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी घेऊन देता येईल. प्रामुख्याने अत्यावश्यक सेवेसाठी, वैद्यकीय कारणासाठी तथा अंत्यसंस्कार किंवा गंभीर रुग्णासाठीच तिचा लाभ घेता येईल.

खासगी बसने आंतर शहर किंवा आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करताना शहरामध्ये जास्तीत जास्त दोन थांबे ठेवाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पासून कडक नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. सकाळी ११ नंतर सर्वत्र सर्वच दुकाने आणि आस्थापने बंद करण्यात आली. आंतरजिल्हा प्रवासावर कडक निर्बंधामुळे जिल्ह्यात दाखल होणारे तसेच जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.