मुंबई (वृत्तसंस्था) : कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड-केअर सेंटर सुरू करायला रा‌ज्य शासनानं मान्यता दिली आहे. सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना गेल्या वर्षाच्या आढाव्याच्या २५ टक्के रक्कमेच्या मर्यादेत कोविड केअर सेंटर सुरू करायला मान्यता दिली आहे. यासाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या भांडवली खर्चाला मंजूरी देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक यांना दिले आहेत. तर, १० लाख रुपयांवरच्या प्रस्तावाच्या भांडवली खर्चाला पणन संचालक मंजुरी देतील.

कोविड केअर सेंटर हे प्रामुख्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करावं. या केंद्रातल्या विलगीकरण कक्षात बाजार समितीनं Oxygen Concentrator, Oxygen Cylinder, बेड इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, सॅच्युरेटेड ऑक्सिजन मशीनचा पुरवठा करावा.

तसंच विलगीकरण कक्षात येणाऱ्या रूग्णांना दोन वेळचं जेवण, नाष्टा आणि चहा यांची व्यवस्था करावी.

कोविड केअर सेंटर चालवताना, राज्य शासनानं कोविडसंदर्भात वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचं पालन करणं कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बंधनकारक राहील, असंही पाटील यांनी सांगितलं.