नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेने पाठवलेली, हवेतून प्राणवायू वेगळा काढणारी ६०० सांद्रीत्र अर्थात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्ली विमानतळावर दाखल झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी आज दिली.

भारताच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करत असल्याबद्दल अमेरिकेला अभिमान वाटत असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी काल सांगितले होते. काल हॉंगकॉंग इथूनही स्पाइस जेट कंपनीच्या विमानातून १ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतात आणण्यात आले.

तसेच, जर्मनीने पाठवलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही काल भारतात दाखल झाल्याचे हरदीप पुरी यांनी सांगितले. इराण, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भूतान, नॉर्वे यांच्यासह इतर अनेक देशांनी भारताला मदत देऊ केली आहे.