नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संबंधित आरोग्य सुविधांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरानं तीन वर्षांसाठी मुदत तरलता सुविधे अंतर्गत ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.

कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अरिष्ट आणि उपाययोजना या संदर्भात त्यांनी ऑनलाईन माध्यामातून आज संवाद साधला. या योजने अंतर्गत बँका, लशींचं उत्पादन करणाऱ्यांना तसंच अन्य आरोग्य सेवा देणाऱ्यांना कर्ज पुरवठा करू शकतील, असंही ते म्हणाले.

आरोग्याशी संबंधीत उपकरणं आयात करणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. खाद्यान्नं आणि इंधनाच्या दरवाढीमुळे  मार्चमधे चलनफुगवटयाचा दर ५ पूर्णांक ५ टक्के होता. तो आता आणखी कमी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या एकूण आर्थिक स्थिती आणि वित्तीय बाजाराच्या स्थितीचं मुल्यांकन केलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं.