मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात म्युकरमायकोसीस अर्थात काळी बुरशी आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचं स्वतंत्र पथक करावं अशा सूचना दिल्या असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
ते काल जालना इथं बातमीदारांशी बोलत होते. या आजारावरच्या रुग्णांसाठी कान, नाक, घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, न्युरोसर्जन, प्लास्टीक सर्जन या विशेषज्ञांची आवश्यकता भासते. प्रत्येक ठिकाणी एकाच छताखाली एवढे विशेषज्ञ उपलब्ध होतील असं नाही.
त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा केली जात असून महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या ठराविक मोठ्या रुग्णालयात या आजारावर उपचार केले जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि खासगी महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ उपलब्ध होतात त्याठिकाणी काळी बुरशीच्या रुग्णांवर उपचाराची सोय करावी, तिथं स्वतंत्र वॉर्ड करतानाच उपचाराची स्वतंत्र पथकं नेमावीत, अशा सूचना केल्याचे टोपे यांनी सांगितलं.