मुंबई (वृत्तसंस्था) : चक्रीवादळाच्या प्रभावामुळं राज्यात ९ जणांचा मृत्यू झाला असून १३ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे. गेल्या २४ तासांत किनारपट्टीवरच्या वीजयंत्रणेची प्रचंड हानी झाली असून महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीची कामे अविश्रांत करीत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
महावितरणच्या १३८ उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला होता. त्यापैकी ७८ उपकेंद्र सुरु करण्यात आली आहेत तर ७०६ पैकी ४३९ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. रुग्णालयांसह ऑक्सिजन प्रकल्प , विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, आदींचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्यानं दुरुस्तीकामं हाती घेतली आहेत, असं त्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यात सुमारे एक लाख ९८ हजार नागरिक काळोखात राहिले अहमदनगर जिल्ह्यात २ हजार रोहित्र बंद पडली होती.
चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लाख रुपयांचे नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे. देवगड इथल्या बोट दुर्घटनेत तिघं जण बचावले असून दोघांचा मृत्यू झाला. अद्याप दोन जण बेपत्ता आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात एकूण ११८९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १०२८ घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कोणत्याही मच्छिमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत सर्व बोटी किनाऱ्यावर आहेतअसं रत्नागिरीच्या मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांनी सांगितलं
रायगड जिल्ह्यात ५ हजार २५३ घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.विजेच्या पाचशे त्रेपन्न खांबांचं नुकसान झालं आहे. झाड आणि भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व तहसिलदारांना दिले आहेत.
पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या भागात झालेल्या नुकसानीची आज सकाळी पाहणी केली. रायगड जिल्ह्यात सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरु होती. नाशिक जिल्ह्यातही मध्यरात्रीपासून पावसाची संततधार होती सांगली जिल्ह्यात चक्रीवादळामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.