नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खतांच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढलेल्या असल्या तरीही शेतकऱ्यांना जुन्या दरानं खतं पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं डीएपी सबसिडीमध्ये १४० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत काल घेण्यात आला.

आता ही सबसिडी प्रति पिशवी ५०० वरुन १२०० करण्यात आली आहे. त्यामुळे खतांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती वाढल्यातरीही, हे खत प्रति पिशवी १२०० रुपये या जुन्या किंमतीलाच उपलब्ध राहील.

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असून किंमतवाढीचा फटका त्यांना बसू नये यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन मोंदी यांनी या बैठकीत दिलं.

कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून खतांच्या सबसिडीमधील ही आजवरची सर्वाधिक वाढ असल्याचं म्हटलं आहे.