मुंबईमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीय उपस्थित राहणार

नवी दिल्ली : देशाच्या जहाज बांधणी, निर्मिती क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या नौवहन (जहाज बांधणी) महासंचालनालयाला उद्या- दि. 3 सप्टेंबर, 2019 रोजी 70 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त मुंबईत उद्या नौवहन महासंचालनालयाचा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जहाज बांधणी खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि रसायन तसेच खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय  उपस्थित राहणार आहेत. या विशेष कार्यक्रमामध्ये 1949 स्थापनेपासून नौवहन क्षेत्रामध्ये भारताचे आत्तापर्यंतचे योगदान नेमके काय आहे, याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये आगामी काळात सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त जहाज उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्याची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे.

जहाज उद्योगाचे कामकाज अधिक सुकर करण्यासाठी महासंचालनालयाने याआधीच अनेक उपाय योजना केल्या आहेत. यामध्ये कालबाह्य नियमांमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत. सागरी किनाऱ्‍यांविषयींचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच नौकाचालकांसाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देणे, त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवणे, ई-गव्हर्नन्स यांचा समावेश आहे. सरकारने नौवहन महासंचालनालयाच्या माध्यमातून केलेल्या सुधारणांचा परिणाम आता दिसून येत आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत.  नाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून आता ती 2,08,000 पर्यंत गेली आहे. त्याचबरोबर गेल्या चार वर्षात देशामध्ये जहाज नोंदणी संख्या 200च्या जवळपास पोहोचली आहे. आगामी दिवसात सागरी वाहतुकीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे आता स्पष्ट झाली आहेत. सरकारने ‘सागरमाला प्रकल्प’ तयार केला असून त्याचाच भाग म्हणून सागरी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

मुंबईमध्ये उद्या होत असलेल्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये देशाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण विभागाच्या सागरी प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधित्व करणा-या चार प्रशिक्षणार्थींचे दल ‘मार्च पास्ट’ अर्थात ‘संचलन’ करतील. यावेळी पाचवे पथक महिला प्रशिक्षणार्थींचे असणार आहे. नौवहन महासंचालनालय, तटरक्षक दल आणि भारतीय नौसेना यांच्यामध्ये असलेले सामंजस्य आणि सौहार्दाचे संबंध दर्शवण्यासाठी, प्रतीक म्हणून या कार्यक्रमामध्ये नौसेना आणि तट रक्षक दलाचेही एक-एक पथक संचलन करणार आहे. सकाळी होणा-या संचलनानंतर नौवहन उद्योग आणि या क्षेत्राशी संबंधित मान्यवरांचा परिसंवाद-चर्चात्मक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये नाविकांचा एक समूहसुद्धा सहभागी होणार आहे.