नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत तरुणांच्या प्रतिभेला पोषक वातावरण तयार करण्याच्या उद्देशानं सक्षमीकरणाच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सुरु केलेली ‘प्रधानमंत्री युवा लेखक प्रशिक्षण कार्यक्रम’ ही त्यापैकी एक महत्त्वाची योजना आहे.

यात ३० वर्षांपेक्षा लहान वयाच्या लेखकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय साहित्य, परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन जागतिक मंचावर घडवू इच्छिणाऱ्या लेखकांना त्यात भाग घेता येईल.

निवडक ७५ लेखकांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात येईल तसंच त्यांना ६ महिन्यांसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची पाठ्यवृत्ती देण्यात येईल.

नॅशनल बुक ट्रस्ट ही योजना राबवत असून या लेखकांची पुस्तकंही प्रकाशित करणार आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी येत्या ३१ जुलै पर्यंत नावं नोंदवावी, असं नॅशनल बुक ट्रस्टनं कळवलं आहे.

प्रतिभावंत युवकांसाठी ही चांगली संधी असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.