वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका ; इरफान सय्यद यांचं आवाहन

पिंपरी : कामगार नेते, महाराष्ट्र शासन कामगार सल्लगार समिती सदस्य, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संघटनेच्या वतीने शहरात सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले आहे.

इरफान सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल डिस्टेंसिंगचे पालन करीत भोसरी विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी कष्टकरी बांधकाम नाका कामगारांना जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना न्यूबलायझेशन मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पाण्याच्या आरओ मशीनचे वाटप होणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन च्या मशीन देण्यात येणार आहे.

शहरातील आशा सेविकांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान होणार आहे. तसेच माथाडी कामगारांना रेनकोटचेही वाटप करण्यात येणार आहे. तसेच रुपिनगर परिसरातील नागरिकांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील मित्र परिवार यांच्या वतीने जुन्नर , आंबेगाव खेड त्याभागातील वृध्दाश्रम तसेच अनाथ नागरिकांना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत तसेच वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

येत्या १७ जून रोजी माझा वाढदिवस आहे. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, असं आवाहन कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी केलं आहे. शहरात कोरोनामुळे होणाऱ्या धोक्याची सूचना देऊन काळजी घेण्याचं कळकळीचं आवाहनही त्यांनी पत्रकाद्वारे केलं आहे.