नवी दिल्ली : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी देशभरातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, ” शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होत आहे.

आपले माजी राष्‍ट्रपति डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करताना आपण एका महान विद्वान आणि शिक्षण क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्वाला अभिवादन करतो. त्यांचे जीवन आणि कार्य नेहमीच शिक्षकांना समर्पित भावनेने कर्तव्य बजावायला प्रेरित करेल.

शिक्षक दिन हा विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या शिक्षकांप्रती समर्पित आहे. ते विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात, त्यांची ज्ञानाची भूक शमवतात आणि त्यांच्यात दडलेली क्षमता आणि प्रतिभा शोधून काढतात.

या पवित्र प्रसंगी, मी समस्त शिक्षक समुदायाला शुभेच्छा देतो ज्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून देशाचे मौल्यवान मनुष्यबळ बनवले आणि मजबूत आणि समृद्ध देशाच्या निर्मितीत अमूल्य योगदान दिले.”