मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. विधिमंडळातील सदस्यांची सर्व संसदीय आयुध गोठवण्यात आल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतला. अखेर यापूर्वी विचारलेल्या तारांकित प्रश्नांना व्यपगत करण्याऐवजी ते अतारांकित प्रश्न म्हणून स्वीकृत केले जातील, असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आले.एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्याच्या स्वप्नील लोणकर यानं आत्महत्या केली; या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात उमटले.
परीक्षार्थीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, स्वप्नीलच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर करावी, या मागणीसाठी विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरील सर्व पदे येत्या ३१ जुलै पर्यंत भरली जातील तसेच लोणकर कुटुंबाला मदतीची भूमिका मुख्यमंत्री घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. राज्याच्या प्रशासकीय खर्चासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सभागृहाला सादर केल्या.