महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेला ‘पे अॅण्ड पार्कचा’ निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयुक्तांना करण्यात आली आहे.
पिंपरी : ‘पे अॅण्ड पार्क’ चा निर्णय हा जनतेस वेठीस धरणारा आहे. महापालिका वेगवेगळ्या करांच्या माध्यामातून जनतेकडून कर वसूल करत असतांना व सध्याच्या कोरोनाच्या महामारीमुळे जनतेची आर्थिक बाजू कोलमडली असतांना ‘पे अॅण्ड पार्कचा’ निर्णय म्हणजे सामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. महापालिकेच्या बोधचिन्हा मध्ये “कटिबद्ध जनहिताय” फक्त लिहण्या पुरतेच आहे, सत्य परिस्थिती ही वेगळीच आहे, असे रिपब्लिकन सेनेचे शहर युवक अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी निवेदनात म्हंटले आहे.
महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून सदर निर्णयास विरोध होणे अपेक्षित होत. मात्र सत्ताधारी आणि महापालिकेच्या संगनमताने नागरिकांची आर्थिक पिळवणूक करण्याचा हा डाव आहे का असा आरोप सदर निवेदनात केला आहे.
सदर निवेदनावर पुणे जिल्हाध्यक्ष दिपक जगताप, भैयासाहेब ठोकळ, बुद्धभूषण अहिरे, समाधान कांबळे संदीप माने. आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.