नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ई-रुपी या नव्या रोखविरहीत आणि संपर्कविरहीत डिजिटल पेमेंट प्रणालीचे लोकार्पण केले. ई-व्हाउचर आधारित ही प्रणाली असून क्युआर कोड किंवा एसएमएसच्या माध्यमातून ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते.

याप्रसंगी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले, थेट लाभ हस्तांतर अर्थात डीबीटीच्या माध्यमातून गरीबांसाठीच्या ३०० योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये ई-रुपी महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. प्रत्येकाला ध्यानात ठेवून, पारदर्शकरित्या आणि कुठल्याही गोंधळाशिवाय लाभ हस्तांरासाठी ई-रुपी व्हाऊचर काम करेल.

विशिष्ट उद्देशाने ही व्हाऊचर तयार करण्यात आली असून त्यात्या सुविधांचा लाभ घेतला जाईल याची खात्री या माध्यमातून होईल. त्यामुळे एखादी संस्था एखाद्या व्यक्तीला शिक्षणस वैद्यकीय उपचार किंवा इतर कुठल्या विशिष्ट कारणासाठी मदत करु इच्छित असेल तर रोख रकमेच्या ऐवजी ई-रुपी व्हाऊचरच्या माध्यमातून ही मदत देता येईल.

प्रत्येक महिन्यात युपीआयद्वारे होणारे व्यवहार नवनवे उच्चांक गाठत आहेत. जुलैमध्ये ३०० कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार याद्वारे झाले. सध्या देशात ६६ कोटी रुपे कार्ड धारक आहेत. आता रुपे कार्ड सिंगापूर आणि भुतानमध्ये सुरू झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.