मुंबई (वृत्तसंस्था) : आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरक्षणाबद्दलच्या प्रश्नाची योग्य माहिती मिळत नाहीए, म्हणूनच ते चूकीच्या मागण्या करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज बातमीदारांशी बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न ५० टक्क्याच्या मर्यादेमुळे अडलेला नाही, तर, सत्ताधाऱ्यांना ते द्यायचंच नाही म्हणून अडला असल्याचं ते म्हणाले. सत्ताधारी आरक्षण न देण्यासाठी कारणं देत आहेत असा आरोप त्यांनी केला. आरक्षणासाठी ५० टक्क्याची मर्यादा महत्वाची नसून, सरकारनं एखाद्या समाजाला तो मागास असणं घोषित करण्याशी आहे. त्याविषयीचे अधिकार राज्य सरकारांना आज संसदेत मांडल्या जात असलेल्या घटनादुरस्ती विधेयकाच्या माध्यमातून मिळणार आहेत. हे विधेयक संमत होण्यासाठी विरोधकांनी मदत करावी असं आवाहान त्यांनी केलं. हे अधिकार मिळाल्यानंतर राज्य सरकारनं आपल्या बाजूची कारवाई करावी असं ते म्हणाले.