नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार महिलांचं शिक्षण, आरोग्य, पोषण, लसीकरण आणि इतर गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशीलतेनं काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आत्मनिर्भर नारीशक्तीसे संवाद’ या कार्यक्रमाला प्रधानमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. देशात महिलांसाठीच्या संधींमध्ये मोठी वाढ झाली आहे, महिला आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून गावं समृद्ध करू शकतील यासाठीचं पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार सातत्यापूर्ण प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले. कोरोनाकाळात बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी देशाला दिलेली सेवा अद्भूत होती अशा शब्दांत त्यांनी या सेवेचा गौरव केला. यावेळी प्रधानमंत्र्यांनी दीनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जिविका मोहिमेशी संबंधित महिला स्वयंसहायता, सामाजिक संसाधन समन्वयक महिलांशी संवादही साधला. या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी चार लाखांहून अधिक महिला स्वयंसहायता गटांना भांडवली अर्थसहाय्य म्हणून १ हजार ६२५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला, याशिवाय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेअंतर्गत अशा गटांमधल्या साडेसात हजार सदस्यांना बियाणांसाठी २५ कोटी रूपयांची मदत आणि ७५ शेतकरी उत्पादक संस्थांना ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी जाहीर केला.