मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शीख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू करण्यात आला असून संबंधित शासकीय विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी. अशा सूचना अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी काल दिल्या. या कायद्याविषयी काल पुणे इथं गुरुद्वारा प्रबंधन समितीच्या सदस्यांबरोबर  झालेल्या बैठकीत त्यांनी या सुचना केल्या.  तसंच आनंद विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी वेबसाईटवर ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करुन द्यावी, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी मलिक यांनी आनंद मॅरेज ॲक्टविषयक महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राची प्रत पुणे इथल्या  गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभेचे अध्यक्ष भोला सिंघ अरोरा यांना सुपूर्द केली. राज्यात आनंद मॅरेज ॲक्ट लागू करण्यात यावा यासाठी मलिक यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी २०२० मध्ये बैठक झाली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीला उशीर झाल्याचं मलिक यांनी सांगितलं. यावेळी आमदार रोहित पवार, अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, विधी व न्याय विभागाचे सहसचिव बनकर आदी उपस्थित होते.