महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या प्रयत्नातून माथाडी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वेतन करार

शिवसेनेचे कामगार नेते इरफानभाई सय्यद यांची यशस्वी शिष्टाई; व्यवस्थापनाचे मानले आभार

पिंपरी : केंद्र सरकारने कोरोना संकटामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन अस्त्राचा अवलंब करीत जनजीवन ठप्प केले. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र मोडकळीस येऊन उदयोगधंदे बंद होण्याच्या मार्गावर होते. सध्या काहीसे निर्बंध शिथिल झाले असले तरी, उद्योगांपुढे अडचणी आ-वासून उभ्या आहेत. कामगार कपात आणि वेतन कपातीच्या निर्णयामुळे कामगार देशोधडीला लागत आहेत. तशातच काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्नही होतोय. शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदुर संघटना आणि महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सल्लागार समिती सदस्य, तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड शहरातील एका नामंकित कंपनीतील युनिट्समध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांना ५२०० रुपयांची घसघशीत पगारवाढ लागू करण्यात आली आहे. ही पगारवाढ जुलैच्या महिन्याच्या पगारामध्ये समाविष्ट देखील करण्यात आहे.

वेतनात भरघोस वाढ झाल्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानिमित्त कामगारांनी इरफानभाई सय्यद यांचा युनियनच्या कार्यालयात नुकताच सत्कार आयोजित केला होता. सत्कारास संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, खंडु गवळी, पांडुरंग काळोखे, पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, आप्पा कौधरी, ज्ञानोबा मुजुमले, सतीश कंठाळे, गोरक्ष दुबाले, सुनील सावळे, अशोक साळुंके, मदने, नागेश व्हॅनवटे, समर्थ नायकवडे, लक्ष्मण सापते, ज्ञानेश्वर पाचपुते, बळीराम कंठाळे, कैलास तोडकर, चंदन वाघमारे, रत्नाकर भोजमे, तसेच माथाडी मंडळातील टोळी क्र. ५२२ चे मुकादम चंद्रकांत पिंगट, टोळी क्र. ५५६ चे मुकादम विश्वनाथ कदम, टोळी क्र. ६१४ व ५७८ चे मुकादम विजय खंडागळे, टोळी क्र. ६२९ चे मुकादम सचिन नाळे, टोळी क्र. ५०७ चे मुकादम गंगाधर स्वामी, टोळी क्र ११६० चे मुकादम महेंद्र तोत्रे, सर्व माथाडी कामगार व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कामगारांनी यावेळी इरफानभाईंचे आभार मानले.

इरफान भाई सय्यद म्हणाले की, कोरोना काळामध्ये कंपनी व्यवस्थापनाने मोलाचे सहकार्य केले. कामगार व उद्योजक हे एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांमधील चर्चेने विषय सोडविण्याचे काम संघटना करीत आहे. यापुढील काळातही कामगार व प्रशासनाने बरोबर राहून कंपनीचे व कामगारांचे हित जपावे. महाराष्ट्र मजूर संघटना ही हिंदु हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व प्रेरणा घेऊन निर्माण झालेली संघटना आहे. कामगार हिताचे बाळकडू प्यायलेली ही संघटना केवळ कामगारांचे हित जपण्यातच धन्यता मानते. त्यामुळे कष्टकरी कामगार हे संघटनेकडे आपलेपणाने पाहतात. आम्ही कामगारांच्या कल्याणासाठी सदैव झटत राहू आणि सर्वच स्तरातील श्रमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत राहू. भरघोस पगारवाढ मिळाल्याने कामगारांना शुभेच्छा.

संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे म्हणाले, वाढत्या महागाईच्या काळात पगारवाढ होणे गरजेचे होते. काबाडकष्ट करणा-या कामगारांना वेतनवाढ व दिलासा निश्चित मिळाला आहे. कामगारांनी आपली एकजूट अशीच कायम ठेवावी.

संघटनेचे जेष्ठ उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर म्हणाले, माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी महाराष्ट्र मजदुर ही एकमेव संघटना आहे. सध्याच्या परिस्थितीत असामाजिक घटकांच्या माध्यमातून काही चुकीची माहिती पसरवीली जात आहे. कामगारांनी याला बळी पडू नये. कामगारांना न्याय देणारं नेतृत्व महाराष्ट्र मजदुर संघटनेकडेच आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव सर्जेराव कचरे यांनी तर, आभार प्रवीण जाधव यांनी मानले.