मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत, त्या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयं आणि खाजगी शिकवणी सुरू करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा येत्या सोमवारपासून स्वनियमावली तयार करून, सुरक्षित अंतर आणि पन्नास टक्के क्षमतेसह शाळा महाविद्यालयं सुरू करण्याचा इशारा, भारतीय जनता पक्षाचे आमदार हरीभाऊ बागडे यांनी दिला आहे. औरंगाबादमध्ये ते काल वार्ताहरांशी बोलत होते. ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशा विद्यार्थ्याला सुद्धा पुस्तकं नसल्यामुळे आज त्याला घरीपण अभ्यास करता येत नाही, आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं जर शिक्षणापासून, अभ्यासापासून लक्ष विचलित झालं तर पुन्हा त्याची अभ्यासाची गती लागणार नाही आणि तो अभ्यासापासून थोडा परावृत्त झाला की तो शाळेपासून थोडा दूर जाण्याची भीती वाटते. म्हणजे पीढी बरबाद होण्याची ही चिन्हं आहेत. माझा सरकारला आग्रह आहे शाळा लवकरात लवकर सुरू केली पाहिजे. दुसरं माझं म्हणणं असं आहे की गणित, इंग्रजी आणि सायन्स या तीन विषयांचे तरी वर्ग सुरू केले पाहिजे. दरम्यान, राज्यात शाळा महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात येत्या चार – पाच दिवसांत निर्णय होईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. शाळा महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागांशी चर्चा सुरु असून, येत्या चार ते पाच दिवसांत कृती दलाचा अहवाल आल्यानंतर निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.