एंटरप्रिनर्स ऑफ नागपूर कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर : जागतिक स्तरावरील उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आजच्या शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

टाईम्स ऑफ इंडियाच्यावतीने हॉटेल सेंटर पॉईंट येथे एंटरप्रिनर्स ऑफ नागपूर या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते यावेळी जेष्ठ पत्रकार सुनील वॉरियर, श्रीपाद अपराजित, संदीप कोल्हटकर व मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रातही मोठे बदल होत आहेत. विविध क्षेत्रातील शिक्षण संधी विद्यार्थ्यांना आता मोठया प्रमाणावर उपलब्ध झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आता देशातच विविध विद्यापीठात आणि शिक्षण संस्थांमध्ये मिळत आहे. जागतिक स्तरावरील व उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था उभारण्यावर आगामी काळात भर द्यावा लागणार आहे. रोजगाराभिमुख व कौशल्य विकासावर आधारित शिक्षणाची आज खरी गरज आहे. आपल्या देशात युवा लोकसंख्या मोठया प्रमाणावर असून या युवा शक्तीचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातही मोठया मनुष्यबळाची यापुढे आवश्यकता भासणार आहे.

नागपूर आता एज्युकेशन हब बनले असून विविध क्षेत्रातील दर्जेदार शिक्षण संधी नागपुरात उपलब्ध झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रासाठीही नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विविध शिक्षण संस्थांच्या उभारणीने सुरुवात झालेल्या पुणे शहरात त्यानंतरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विस्तारले ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. शिक्षणाची नवी क्षितीजे विस्तारण्यासाठी यापुढील काळात शिक्षण संस्थाना अधिक स्वातंत्र्य देण्याचा विचारप्रवाह जोर धरत आहे. दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण शिक्षणासाठी अशी स्वायत्तता देणे नक्कीच उपयुक्त ठरेल. शिक्षण क्षेत्रातील उमेदवारांना गौरविणे हा स्तुत्य उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी सुनील रायसोनी, रजनीकांत बोंदरे, समीर मेघे, अनिता वानखेडे, शांतीलाल बडजाते, केतन मेहता, गौतम राजगरीया, फादर पॉल, संजय अग्रवाल, अजय अग्रवाल, डॉ. समीर फाले आदींना एंटरप्रिनर्स ऑफ नागपूर या सन्मानाने गौरविण्यात आले.