मुंबई (वृत्तसंस्था) : नारायण राणे यांच्या वक्तव्याचं भारतीय जनता पार्टी समर्थन करत नाही, मात्र सरकार त्यांच्याविरोधात ज्या रितीनं पोलिसांचा गैरवापर करत आहे,त्याबाबतीत भाजपा पूर्णतः नारायण राणे यांच्या पाठिशी उभा आहे, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज बातमीदारांशी बोलत होते.
पोलिसांनी अवैधपणे नारायण राणे यांना अटक केली तर जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अनेकांना राग येऊ शकतो, ते स्वाभाविक आहे, त्याचा निषेध व्हायला हरकत नाही,मात्र त्यानंतर होत असलेले प्रकार सहन करण्यासारखे नाहीत असं फडनवीसयांनी सांगितलं.
भाजपा हिंसेबाज नाही, मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर कोणावर कोणी हल्ला केला तर ते अजिबात सहन करणार नाही. असे हल्ले करणाऱ्यां विरोधात पोलिसांनी कारवाई केली नाही, तर त्या त्या ठिकाणच्या पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करू असा इशारा फडनवीस यांनी दिला. या सगळ्या घटनांच्या बाबतीत कायद्याचं राज्य अपेक्षित आहे असं ते म्हणाले.केंद्रीय मंत्री आणि वैयक्तिकरित्या आपल्याविरोधातही अनेकदा अपशब्दांचा वापर होतो, मात्र त्यावेळी पोलीस कारवाई करत नाही.अशी दुटप्पी भूमिका असू नये, असंही फडनवीस यावेळी म्हणाले.
गृहराज्यमंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य अत्यंत बेजाबदार आणि केंद्रीय मंत्रीपदाला न शोभणारं आहे, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीकेली आहे. नारायण राणे यांनी आपलं वक्तव्य मागं घ्यावं अन्यथा प्रतिक्रि या येणारच. नियमानुसार राणे यांच्यावर कारवाई होणारच असा इशाराही देसाई यांनी दिला.