मुंबई (वृत्तसंस्था) : एएनएम म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम म्हणजेच जनरल नर्सिंग मिडवाइफरी या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी अर्थात सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाही, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शुश्रुषा आणि  परावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हा निर्णय झाला. यापूर्वी एएनएम आणि जीएनएमच्या प्रवेशप्रक्रिया या सीईटीच्या गुणांवर आधारीत होत्या. मात्र या वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया ही बारावीच्या गुणांवर आधारीत असेल, असं त्यांनी सांगितलं.

कोविड सारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला डॉक्टरांबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं महत्व जाणवलं आहे. किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात याबाबतचा अभ्यास करुन अहवाल तयार करावा अशा सूचनाही देशमुख यांनी  यावेळी केल्या. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळत आहे का याबाबतची पाहणी करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.