नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जनधन योजना यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात आभार मानले आहेत. त्यांच्या परिश्रमांमुळेच आज भारतातला सामान्य नागरिकही उत्कृष्ठ आयुष्य जगतो आहे, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या जनधन योजनेला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ मध्ये ही योजना दाखल केली होती. देशातील प्रत्येक व्यक्तीला बँकिंग व्यवस्थेचा लाभ घेता यावा या उद्देशाने ही महत्त्वाकांक्षी योजना दाखल करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेंतर्गत ४३ कोटी ४ लाखांपेक्षा अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत.

या खात्यांमध्ये एक लाख ४६ हजार कोटींहून अधिक रक्कम शिल्लक आहे. ८ कोटी जनधन खातेधारकांच्या खात्यात विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान थेट हस्तांतरीत होत आहे. दरम्यान, प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ महिलांना जास्त झाल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.

फक्त सात वर्षांच्या कालावधीत प्रधानमंत्री जनधन योजनेनं घडवून आणलेली स्थित्यंतरं आणि दिशादर्शक परिवर्तन यामुळे देशातल्या प्रत्येकापर्यत आर्थिक सेवा पोचवण्यासाठी ही योजना सक्षम झाली आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.  प्रधानमंत्री जनधन योजनेला आज सात वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं त्या बोलत होत्या.