नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आणि राज्यातही गेले काही दिवस उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुक्तीचा दर घसरत चालला आहे. काल देशभरात ३४ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३ कोटी १९ लाख २३ हजाराच्या वर गेली आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे. काल ४२ हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले, तर ३८० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या कोरोनाबळींची संख्या आता ४ लाख ३८ हजार २१० झाली आहे. देशभरात सध्या ३ लाख ७६ हजार ३२४ रुग्ण उपचाराधीन आहेत.देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ६३ कोटी ४३ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ३१ लाख १४ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.