मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं पुन्हा जोर धरला आहे. काही ठिकाणी त्यामुळं दिलासा मिळालाय तर काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. राजधानी मुंबई सह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मुंबईसाठी यलो अलर्ट तर पालघरमधे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधेही येत्या बुधवारपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असल्यानं प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याकाळात किनारपट्टीवर सोसाट्याने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. याबाबत हवामानविभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितलं.
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, आणि वाशिम जिल्ह्यांमधे अतिवृष्टीची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढचे 5 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. अनेक नद्यांचे प्रवाह फुगले आहेत. धरणं भरुन वाहत आहेत.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरसह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. कोयना धरणातली पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 25 हजार क्युसेक पाणी कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क रहावं, असं आवाहन सातारा आणि सांगली जिल्हा प्रशासनानं केलं आहे. वारणा धरणातला विसर्ग आता 5 हजार 482 क्युसेक्स करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यातलं चांदोली धरण 99 पूर्णांक 86 टक्के भरलं असून धरणातला विसर्ग वाढवून तो 8 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. उद्या दुपारपर्यंत कृष्णा नदीची पाणी पातळी 20 ते 22 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनानं वर्तवला आहे.
नाशिक जिल्ह्यात पालखेड धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असून 800 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. गंगापूर धरणातून अडीच हजार क्यूसेकचा विसर्ग होणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भातसा धरण क्षेत्रात काल पासून पावसाची संतत धार सुरू आहे. धरणाचे पाच दरवाजे आज एक मीटर नं उघडले असून सध्या 18 हजार क्यूसेक्स नं पाण्याचा विसर्ग होत आहे. नांदेड जिल्ह्यात आज सरासरी ९ पूर्णांक ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.