मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पाणीटंचाईप्रवण क्षेत्रात लोकसहभागातून ५०० कोटी लिटर जलसाठा करण्यासाठीची चळवळ उभी राहिली आहे. भारतीय राजस्व सेवेतले सह आयुक्त डॉ.उज्वलकुमार चव्हाण यांनी २०१९ मधे ११ जणांना सोवत घेऊन जळगाव जिल्ह्यात ही चळवळ सुरु केली. लोकसहभागातून शेतातला गाळ उपसणं. बांध बंदिस्ती, पाणी प्रवाहांचं खोलीकरण अशी कामं करण्यात आली. त्यात काही स्वयंसेवी संस्थांनीही हातभार लावला. परिणामतः यंदा या भागात पाणीटंचाईचं संकट आलं नाही असं स्थानिकांनी सांगितलं. चाळीसगाव तालुक्यातल्या हिरापूर गावात काल या चळवळीचा भाग म्हणून जलफेरी काढण्यात आली. चळवळीत योगदान देणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. ही चळवळ उस्मानाबाद,औरंगाबाद आणि सातारा जिल्ह्यातही पोचली आहे.