मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्गियांच्या आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही याचा खुलासा राज्यसरकारने करावा अशी मागणी भाजपाने केली आहे. राज्यातलं आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत गेले ६ महिने टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आज सोलापूरमधे पत्रकारपरिषदेत केला. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं पाहिजे असं देशमुख म्हणाले. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधात भाजपानं उद्या राज्यव्यापी आंदोलन पुकारलं असल्याची माहिती त्यांनी दिली.