नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण खात्याच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं. हे नवीन संकुल नव्या भारताचं गमक असून संरक्षणदलांना मजबूत करणारं तसंच व्यवसायानुकूल वातावरणासाठी पोषक ठरेल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. या संकुलाचं बांधकाम २ वर्षात पूर्ण होणं अपेक्षित होतं ते केवळ एका वर्षातच पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. अत्याधुनिक सोयीसुविधा उभारतानाच जगण्याला आणि व्यवसायाला हात देणं हाच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा उद्देश आहे असं सांगून ते म्हणाले, कोविड काळात या प्रकल्पाने शेकडो हातांना रोजगार दिला.सेनादलांचं आधुनिकीकरण आणि संरक्षणविषयक आत्मनिर्भरता हे प्रधानमंत्र्यांच्या प्रयत्नाचं फलित असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या भाषणात म्हणाले.पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाचं संचलन नवीन सेंट्रल व्हिस्टामधे होईल तसंच संसदेचं कामकाज नव्या इमारतीत सुरु होईल, असा विश्वास केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी व्यक्त केला. नव्या संरक्षणदल संकुलात अत्याधुनिकता, ऊर्जासक्षमता,आणि व्यापक सुरक्षितता यांचा मिलाफ पहायला मिळतो. तिन्ही सेनादलांच्या मिळून सात हजार अधिकाऱ्यांची कार्यालयं या संकुलात आहेत.