नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ केला. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेनं हा प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेल्वेच्या देशभरातल्या ७५ प्रशिक्षण केंद्रांमध्ये युवकांना उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्यांविषयी प्राथमिक स्तरावरचं प्रशिक्षण दिलं जाईल. या कार्यक्रमाअंतर्गत देशभातल्या ५० हजार युवकांना प्रशिक्षित केलं जाणार आहे. देशभरात विश्वकर्मा जयंती साजरी होत असतांनाच हा कार्यक्रम सुरु होत असल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छाही दिल्या.