राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक
मुंबई : राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील कुलगुरुंनी स्वतः लक्ष घालून आपले विद्यापीठ हे उत्कृष्टतेचे केंद्र (Centre of excellence ) बनवावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यातील विविध कुलगुरुंसमवेत आज राजभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि सर्व विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंनी विचारमंथन करून काही ठोस अशा सूचना कराव्यात. उत्तम विद्यार्थी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण अशी आपल्या राज्याची ओळख तयार व्हावी. प्राध्यापकांनी अधिक समरसतेने शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी योगदान द्यावे. नव्या विद्यापीठ कायद्यासंदर्भात काही अडचणी किंवा सूचना असल्यास त्याबद्दलही कुलगुरुंनी शासनाला कळवावे, असेही ते म्हणाले.
उपस्थित कुलगुरुंची ओळख करून दिल्यानंतर राज्यातील उच्च शिक्षणाच्या सद्यस्थितीबद्दल सांगताना श्री. तावडे म्हणाले, राज्यात नॅक कडून ‘अ’ दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांची संख्या ही 350 आहे तर 73 महाविद्यालये ही स्वायत्त आहेत. उच्च शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी राज्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यापीठ कायद्यात सन 2017 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. विद्यार्थी केंद्रित निर्णयांचा यात समावेश करण्यात आला. राज्यातील कानाकोपऱ्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी क्लस्टर विद्यापीठ आणि स्वायत्त विद्यापीठांना चालना देण्यात आली. विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय एकाच वेळी शिकता यावे यासाठी निवड आधारित विषय असलेले आंतर विषय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. लवकरच पदवी अभ्यासक्रमात ही पद्धती सुरु करण्याचा शासनाचा मानस असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.
यावेळी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सिद्धार्थ काणे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, कवी कुलगुरु संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वराखेडी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु तसेच डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु श्रीमती डॉ.मृणालीनी फडणवीस, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धव भोसले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.पी.विश्वनाथ, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.व्ही.एम.भाले, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.ए.एम.पातुरकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.ए.एस.धवन, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत उपस्थित होते.
यावेळी सर्व विद्यापीठातील कुलगुरुंच्या वतीने राज्यपालांना देवी सरस्वतीची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.