मुंबई (वृत्तसंस्था) :मुंबईत गोरेगाव पूर्व येथे गृहविभागाच्या फोर्स वन विशेष सुरक्षा पोलीस पथकासाठी दिलेल्या जागेतून राखीव पाच एकर जागेवर आदिवासी पाड्यातील कुटुंबांचे कालबद्ध रितीनं पुनर्वसन करायचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. वर्षा येथील समिती कक्षात फोर्स वन प्रशिक्षण केंद्रासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या फोर्स वनला प्रशिक्षण, कसरत आणि साहसी कवायतीसाठी मुंबई उपनगरात जागा देण्यात आली आहे. या जागेत तीन पाडे असून काही कुटुंबं वास्तव्यास आहेत. यात आदिवासी आणि बिगर आदिवासी कुटुंबे देखील आहेत. यातील आदिवासी कुटुंबांना म्हाडामार्फत फोर्स वनच्या राखीव पाच एकर जागेत घरे बांधून देण्यात येतील तर उर्वरित बिगर आदिवासी कुटुंबांना त्यांची कागदपत्रे तपासून प्रकल्पग्रस्तांसाठीच्या निवास व्यवस्थेत घरे देण्यात येतील. बिगर आदिवासी कुटुंबांचे एसआरएमार्फत महिनाभरात सर्वेक्षण करून त्यांना कटआऊट डेटनुसार घरे उपलब्ध करून दिली जातील. आदिवासी कुटुंबासाठी घरे बांधण्यासाठी म्हाडाने सल्लागार नेमून घरांचा आराखडा निश्चित करून पुढील प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.