पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असल्यानं तिथले निर्बंध आणखी शिथिल कारण्याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. कोरोना विषयक आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढील आठवड्यात पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.शहरातील जलतरण तलाव आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील खुले करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचवेळी परिस्थिती सुधारत असली तरी सर्वानी मुखपट्टी अर्थात मास्क वापरणं अनिवार्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश आपण बैठकीतही दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या शाळा पुढच्या महिन्यात सुरु करण्याच्या निर्णयामागची भूमिकाही पवार यांनी यावेळी स्पष्ट केली. ऑनलाईन शाळांवरील मर्यादा लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितले.