मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून सर्व धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली झाली आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुंबादेवीचं दर्शन घेतले. कोरोनाचं सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली आहे. धार्मिक स्थळी आरोग्याच्या नियमांचं काटेकोर पालन सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे असं मुख्यंमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.
सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त आणि पुजाऱ्यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या दर्शनाची व्यवस्था केली, परिसराची वरचेवर स्वच्छता – सुरक्षित अंतर – जंतूनाशकांचा वापर इत्यादी काळजी घेतली तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीनं शारदीय नवरात्रौत्सव आणि घटस्थापनेनिमित्त गाभाऱ्यात तसंच मंदिरात आकर्षक आणि नयनरम्य अशी तुळशीच्या पानांची, तसंच फुलांची सुंदर आरास केली आहे.
तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदीरात साजऱ्या होणाऱ्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तुळजापूर शहरात प्रशासनानं उभारलेले सीसीटीव्ही आणि मंदीरातल्या सीसीटीव्ही कक्षातून पोलीस या व्यवस्थेवर नजर ठेउन आहेत. तुळजापूरात येणाऱ्या मार्गांवर पोलीसांनी अडथळे आणि चौक्या उभारल्या असून आत येणारी वाहनं, पर्यटक यांची कोविड मनाई आदेशांसंबंधी पूर्तता झाल्याची खात्री करुनच त्यांना गावात प्रवेश दिला जात असून तुळजापुरातल्या दोन्ही बसस्थानकांत साध्या पोशाखातल्या पोलीसांची गस्त सुरु आहे.
शिर्डीत साईबाबांचं मंदिर खुलं होणार असल्यानं आधीच शिर्डीत भाविकांचा ओघ सुरु झाला होता. कालपासूनच मंदिर आणि परिसरात रांगोळ्या काढून पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. आज पहाटे काकड आरतीनं साईबाबांचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं झालं. रोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर राहणार आहे. दररोज पंधरा हजार भाविकांना कोरोना नियमांचं पालन करुन दर्शन देण्याचं नियोजन संस्थाननं केलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथलं प्रसिद्ध आठवं ज्योतिर्लिंग भाविकांसाठी आज सकाळी सहा वाजल्यापासून खुलं केलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे इथलं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. दर्शनासाठी वेळा ठरवून दिल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष पूजा, अभिषेक, आरती तसंच दैनंदिन महाप्रसाद इत्यादी सेवा भाविकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे.
भंडारा शहरात नामवंत रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी शहरातल्या प्रसिद्ध शीतलामाता मंदिरात दुर्गा देवीची थ्रीडी रांगोळी साकारली आहे. ही १०० चौरस फुटांची रांगोळी काढण्यासाठी आठ दिवस, आणि तब्बल ६० किलो रांगोळी लागली आहे.
वाशिम इथलं ऐतिहासिक बालाजी मंदिर भविकांसाठी खुलं झाल्यानं मंदिराचा परिसर पूजेच्या सामानाच्या दुकानांनी सजला आहे. भाविक दर्शनासाठी मंदिरात येत आहे. दरवर्षी आजच्या दिवशी श्री बालाजीचा मुख्य वार्षिक उत्सव सुरू होता, कोविडचे नियम पाळून या उत्सवाला मंदिरात सुरुवात झाली आहे.
सांगलीतलं श्री गणपती पंचायतन संस्थानचं गणपती मंदिर,तसंच मिरज शहरातील मिरासाहेब यांचा प्रमुख दर्गाह लोकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून दर्शनास सुरुवात करण्यात आली. गणेशभक्त मोठ्या उत्साहात मंदिरात दर्शनास येत आहेत. श्री गजानन हें सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे. त्याचप्रमाणे मिरज येथील मीरा साहेबांचा दर्गा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानला जातो.