नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारतीय अवकाश संघाचा प्रारंभ केला. निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या सरकारमुळेच अवकाश क्षेत्र आणि अवकाश तंत्रज्ञानासंदर्भात आज देशात महत्वाच्या सुधारणा होत आहेत, असं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. खासगी क्षेत्राला नवनवीन कल्पना राबवण्याचं स्वातंत्र्य देणं,सरकारनं त्यांच्या सक्षमीकरणासाठी सहकार्य करणं, तरुणांना भविष्यकाळासाठी घडवणं आणि अवकाश क्षेत्राद्वारे सर्वसामान्य नागरिकांचा विकास साधणं या चार गोष्टी केंद्रस्थानी ठेवून अवकाश क्षेत्र आणि तंत्रज्ञानामध्ये सरकार काम करत आहे, असं ते म्हणाले. भारतीय अवकाश संघाच्या निर्मितीमुळे या क्षेत्रातलं विकसित तंत्रज्ञान खाजगी क्षेत्राला खुलं होणार आहे. ‘जिओ टॅगिंग’ मुळे विकास योजनांचं परीक्षण सुलभ होईल, ‘सॅटेलाईट इमेजिंग’मुळे नैसर्गिक संकंटांबाबत भविष्यवाणी, पर्यावरण संरक्षण, सागरी मच्छीमारांना साहाय्य होईल, संपर्क यंत्रणा गतिमान झाल्यामुळे सर्व स्तरावर लाभ होईल, असंही मोदी यांनी सांगितलं. आजच्या निर्णयाचा फायदा भविष्यात भावी पिढयांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.त्याआधी प्रधानमंत्र्यांनी अवकाश उद्योगातल्या प्रतिनिधींशी संवाद साधला. भारतीय अवकाश संघ अवकाश क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत करत महत्त्वाचं स्थान मिळवून देईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळ व्यक्त केली.