मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून नव्याने १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची स्थापना झालेली आहे. रंगमंचावरील प्रयोगाच्या संहिताचे पूर्वपरिक्षण करुन सार्वजनिक करमणूकीच्या जागी प्रयोग सादर करण्यासाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून योग्यता प्रमाणपत्र देण्यात येते. प्राप्त संहितांचे पूर्वपरिक्षण करण्यासाठी साहित्य, कला क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ मान्यवरांची शासन निर्णय दि.२२ मे २०१८ व दि.१६ नोव्हेंबर २०१८ अन्वये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, दि.१८ जानेवारी २०२० च्या शासन निर्णयान्वये या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर शासन निर्णय दि.१६ डिसेंबर २०२० अन्वये रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यात आली होती.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या समितीमध्ये नव्याने काही सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून या नवनियुक्त सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे- सर्वश्री संतोष भांगरे, विनोद खेडकर, अभिजित झुंजारराव, विशाल शिंगाडे, राजेंद्र बरकसे, संभाजी वतांगडे, डॉ. दशरथ गणपती काळे, मिलिंद कृष्णाजी शिंदे, खंडुराज गायकवाड, श्रीमती गीरा शेंडगे, सुभाष भागवत, स्वप्नील मुनोत, एम. बी. थोडगे, किरणसिंह जयसिंगराव चव्हाण, संदिप दिगंबर जाधव या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.