मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं निदर्शनास आलं आहे. कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेनं आजवर दोन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. तिसऱ्या तुकडीमध्ये एकूण ३४३ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’चे ५४ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे ३४ टक्के तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण आढळले आहेत. कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणं तसंच कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.