मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या यावर्षीच्या प्रथमसत्र परिक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. इयत्ता दहावीच्या मुख्य विषयांची परीक्षा ३० नोव्हेंबरपासून तर इयत्ता बारावीच्या मुख्य विषयांची परीक्षा १ डिसेंबरपासून सुरू होईल. इयत्ता दहावीच्या वैकल्पिक विषयांची परीक्षा १७ नोव्हेंबर तर इयत्ता बारावीची परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होईल असं मंडळांनं एका पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे असून सकाळी साडे अकरा वाजता परीक्षा सुरू होईल. १५ वी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा १६ नोव्हेंबर ते १ जानेवारी २०२२ दरम्यान घेणार असल्याचं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलं आहे. ही परिक्षा केवळ संगणक प्रणालीद्वारेच घेण्यात येणार आहे.  या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे.